Team DakshTimes: Kashinath Shinde
चाकण परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर कोयत्यासह फोटो व्हायरल करणाऱ्या एका इसमाला क्राईम ब्रँच, युनिट ०३ ने ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीधन इचके, ऋषिकेश भोसुरे, मनोज साबळे व पोलीस शिपाई निखिल फापाळे हे चाकण पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसम हा देवेंद्र आयकॉन, चक्रेश्वर रोड, चाकण येथे कोयता घेऊन थांबला असल्याचे समजले. तसेच त्याने सोशल मीडियावर कोयत्यासह फोटो व्हायरल करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून संबंधित इसमाला कोयत्यासह ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 (25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) व 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
या कारवाईमुळे चाकण परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून क्राईम ब्रँचच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
