Team DakshTimes: Kashinath Shinde
आकुर्डी दि. १५ एप्रिल: महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभाराचा फटका आरटीई (RTE) प्रवेश प्रक्रियेदरम्यान बुधवारी प्रकर्षाने जाणवला. आकुर्डी येथील उन्नत शहर साधन केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पूर्ण अभाव असल्याने सुमारे ८०० ते ९०० पालकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहावे लागले. वाढत्या गर्दीमुळे केंद्रावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून रेटारेटीतून चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली. महिला पालकांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागला.
पहाटेपासूनच पालकांनी केंद्रावर गर्दी केली होती. मात्र, कागदपत्र पडताळणीसाठी जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने केवळ सुरक्षा रक्षकांकडून नावनोंदणी करण्यात येत होती. यामुळे संतप्त पालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही वारंवार हेलपाटे मारायचे का?” असा सवाल करत काही पालकांनी केंद्रावरच आक्रोश व्यक्त केला. परिस्थिती इतकी चिघळली की काही ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि पालकांमध्ये वादावादीही झाली.
दुपारी एक वाजेपर्यंत अधिकारी न आल्याने गोंधळ शिगेला पोहोचला. त्यानंतर लिपिक प्रिंस सिंग केंद्रावर दाखल झाले आणि कागदपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली. मात्र, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची मागणी करूनही तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही.
अखेरीस दुपारी अडीच वाजता दोन अतिरिक्त सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले. टोकन वाटप थांबवून पहिल्या मजल्यावरील सभागृहात नव्याने व्यवस्था करण्यात आली. ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देत पुरुष व महिलांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात आल्याने काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली. दुपारी तीननंतर पडताळणी समिती व अतिरिक्त कर्मचारी दाखल झाल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.
दरम्यान, पिंपरी येथील केंद्रावरही अशाच प्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील केंद्रावर अधिकारी अनुपस्थित असल्याने पालकांना दुपारी तीननंतरच बोलावण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अत्यल्प मनुष्यबळातही त्यांनी पालकांना शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रांगा सुव्यवस्थित करण्यात आल्या.
याबाबत बोलताना बांगर म्हणाल्या, “पटपडताळणीसाठी पथक बाहेर गेल्यामुळे अचानक गर्दी वाढली. दुपारी तीननंतर १३ जणांचे पथक दाखल झाले. एकूण ७५६ पालकांची कागदपत्रे जमा करण्यात आली असून सुमारे २०० कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उद्यापासून कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही.”
या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
