Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना गणवेश व शैक्षणिक साहित्य ठरावीक दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा सक्तीला तात्काळ आळा घालावा आणि पालकांना स्वेच्छेने खरेदी करण्याची मुभा द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महापालिकेच्या उपयुक्त ममता शिंदे यांना निवेदन सादर करत शासनाच्या स्पष्ट निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालयाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, कोणत्याही शाळेला पालकांना विशिष्ट दुकानातून गणवेश, वह्या, पुस्तके, बूट, दप्तर किंवा इतर साहित्य खरेदी करण्यास भाग पाडण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच राज्य मंडळ, CBSE व ICSE आदी शिक्षण मंडळांच्या शाळांनी केवळ मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकांचाच वापर करावा, असेही शासनाचे निर्देश आहेत. मात्र काही शाळांकडून विशिष्ट प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर महापालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांना तातडीने परिपत्रक काढून नियमांची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, पालकांना बाजारातून परवडणाऱ्या दरात साहित्य खरेदी करण्याची मुभा द्यावी, तसेच तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
