Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी पोलिसांनी गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी प्रभावी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे (राऊंड) तसेच दोन मॅगझिन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दापोडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करत असताना दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पोलिस हवालदार प्रविण पाटील यांना गुप्त माहिती मिळाली. कासारवाडी परिसरातील फुटपाथवर दोन इसम पिस्तुलांसह संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी यश नंदकिशोर कांबळे आणि अथर्व सुनील भोकरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत यश कांबळे याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल, एक मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली, तर अथर्व भोकरे याच्याकडून एक पिस्तुल, एक मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. एकूण सुमारे १.३९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहा. पोलिस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील, उपनिरीक्षक राजू भास्कर तसेच पोलीस अंमलदार नितीन संकुनहट्टे, विशाल काळे, आकाश सोनवणे आणि संजोत ओव्हाळ यांनी ही कारवाई यशस्वी केली.
