Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण ११६.५४ ग्रॅम एमडी, तीन मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण १३ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत, खालुंब्रे गावाजवळ करण्यात आली. पोलिसांना संशय आल्याने एमएच १४ सीए ९९३७ या दुचाकीवरील व्यक्तींना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडून एमडी हा अमली पदार्थ आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
- शिशुपाल धनाराम चौधरी (वय २५ वर्षे)
- रामदिन भवरलाल चौधरी (वय २४ वर्षे)
- परवीन मल्लाराम चौधरी (वय २२ वर्षे)
आरोपींकडून ११६.५४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), तीन मोबाईल फोन व एक दुचाकी असा एकूण १३,८६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जासभाये करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनायककुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शकूर तांबोळी, पोलीस हवालदार शिल्पा कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, विजय दौंडकर, निखिल शेटे, पोलीस शिपाई गोविंद डोके, कपिलेश इगवे, निखिल वर्पे, प्रतिक कवडे यांनी ही कारवाई पार पाडली. तसेच पोलीस अंमलदार सुभाष गुरव यांनी तांत्रिक विश्लेषणासाठी मदत केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अंमली पदार्थांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी अमली पदार्थविरोधी पथक (मो. ८६००००२३२०), पोलीस हेल्पलाईन ११२ किंवा मानस हेल्पलाईन १९३३ यावर संपर्क साधावा.
