oplus_131072
काशिनाथ शिंदे
पिंपरी : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राचा श्वास होते. संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कर्जाच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून कर्जमुक्ती केली होती. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची दारे खुली केली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी केले.
महापालिकेच्या चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीचा आणि बक्षीस वितरण सोहळा रविवारी (दि. २९) आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, खासदार श्रीरंग बारणे, अखिल भारतीय साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, माजी आमदार अशोक पवार, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे निबंधक प्रा. विश्वजित जाधव, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, संतोष बारणे, संतपीठाचे संचालक अभय टिळक, ह.भ.प. राजूमहाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे आदी उपस्थित होते.
भारतीय गायन, भक्तिगीत, गझल, सोलो आणि समूहगायन अशा विविध प्रकारांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आसाम, जम्मू-काश्मीर, झारखंड, आंध्र प्रदेश, पंजाब, चंदीगड आणि उत्तराखंड या राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तसेच अमेरिकेतील स्पर्धकांचाही सहभाग होता. देश-विदेशातील सुमारे ५७९ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेतील ६४ विजेत्या स्पर्धकांना शरद पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी सदानंद मोरे, श्रीरंग बारणे, अवधूत गुप्ते, प्रा. विश्वजित जाधव आणि डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करीत स्पर्धकांचे कौतुक केले.
———
