कोरियन व्यावसायिक पद्धती, उद्योजकता आणि जागतिक बाजारपेठेतील संधींची विद्यार्थ्यांना करून दिली ओळख
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे: आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रातील संधी, कोरियन व्यावसायिक संस्कृती आणि उद्योजकतेच्या विविध पैलूंची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे एमबीए विद्यार्थ्यांसाठी ‘कोरिया व्यवसाय आणि संस्कृती’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इंडिया कोरिया एज्युकेशन अँड ट्रेनिंग सर्व्हिसेस (आयकेट्स), कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सी (कोस्मे) आणि स्टारजिन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही स्वरूपांत पार पडली.
या कार्यशाळेला कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सीचे (कोस्मे) संचालक सेउंग जंग कांग, एसबीपीआयएमच्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे, डॉ. ऐश्वर्या गोपाल कृष्णन, डॉ. प्रणिता बुरबुरे आदी उपस्थित होते.
यावेळी संचालक सेउंग जंग कांग यांनी विद्यार्थ्यांना कोरियातील व्यावसायिक कार्यपद्धती, कॉर्पोरेट संस्कृती, उद्योजकता, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि आंतरसांस्कृतिक दृष्टिकोन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कोरियाची वेगाने विकसित होणारी व्यावसायिक परिसंस्था, जागतिक बाजारपेठेतील संधी, व्यावसायिक शिष्टाचार, प्रभावी संवादकौशल्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि यशस्वी व्यावसायिक संबंध निर्माण करण्याच्या पद्धतींची माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यावसायिक वातावरण समजून घेण्यास मदत झाली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.






