काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने आळंदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू साठवणुकीवर कारवाई करत १५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका १९ वर्षीय युवकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस हवालदार बिराजदार, पोलीस शिपाई खेडेकर व पोलीस शिपाई राठोड हे आळंदी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली. दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सोळू गाव हद्दीतील ज्योती कंपनीच्या पाठीमागे वकील वस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या देशी दारूचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.
कारवाईदरम्यान राहील राजू राजपूत (वय १९, रा. कांबळे वस्ती, सोळू, ता. खेड, जि. पुणे) याच्या ताब्यातून ११ हजार ५२० रुपये किमतीचे देशी पॉवर पंचचे ८ बॉक्स, त्यामध्ये १८० मिलीच्या १४४ काचेच्या बाटल्या तसेच ४ हजार रुपये किमतीचे देशी टॅंगो पंचचे १ बॉक्स, त्यामध्ये ९० मिलीच्या १०० प्लास्टिक बाटल्या असा एकूण १५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







