काशिनाथ शिंदे
पुणे : अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला असून, आता सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन, तेलात भेसळ, मुदत संपलेले तेल पुन्हा विक्रीस ठेवणे किंवा तेलाची अयोग्य पद्धतीने साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
सुटे खाद्यतेल विक्री करताना आवश्यक लेबल नसणे, तेलाचा स्त्रोत स्पष्ट नसणे, तसेच अस्वच्छ किंवा गंजलेल्या डब्यांमध्ये तेलाची साठवणूक करणे, असे प्रकार तपासणीदरम्यान आढळून येत आहेत. अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे.
तेलात भेसळ करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दोष सिद्ध झाल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
त्यामुळे सुटे खाद्यतेल विक्रेते, साठवणूकदार आणि संबंधित व्यावसायिकांनी अन्नसुरक्षेचे नियम पाळावेत, अन्यथा थेट कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
भेसळीच्या तेलातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची आता खैर नाही! FDAच्या या कारवाईमुळे खाद्यतेलातील भेसळीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







