गावजत्रा मैदानावर पोलिसांचा सापळा; दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गावठी पिस्टलची विक्री करणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने भोसरी येथे सापळा रचून अटक केली. मंगेश मालू कोकणे (वय २०, रा. मुगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले होते. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून अवैध शस्त्रांची माहिती घेऊन कारवाई सुरू होती.
दरम्यान, पथकातील अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर आणि हर्षद कदम यांना ‘एम. के.’ नावाचा व्यक्ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पिस्टल विक्रीसाठी ग्राहकांच्या संपर्कात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची तांत्रिक पद्धतीने पडताळणी करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या पथकाने गुरुवारी (२० ऑगस्ट) भोसरी येथील गावजत्रामैदानावरसापळा रचला. पोलिसांच्या कारवाईत मंगेश कोकणे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता विक्रीसाठी आणलेली दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडे ही शस्त्रे कुठून आली, ती कोणाला विक्री केली जाणार होती तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, तसेच अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर, गणेश कोकणे, हर्षद कदम, अशोक मरळ व पथकाने केली.







