भवानी पेठेतील मारहाण प्रकरण; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई
काशिनाथ शिंदे
पुणे : गंभीर मारहाण प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या साहिल इरफान दावतखानी (वय २२) याला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ने अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवार पेठ परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी भवानी पेठेतील भारत टॉकीजजवळील दादापीर दर्गा परिसरात चार जणांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच फरशीच्या तुकड्याने हल्ला करून दोघांना जखमी केले आणि धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणानंतर साहिल दावतखानी हा फरार होता. त्याचा शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला त्याच्याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवार पेठ परिसरात सापळा रचून त्याला पकडले.
या कारवाईमुळे गंभीर मारहाण प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत.







