आगळगाव, धसपिंपळगावात तीन स्वतंत्र कारवाया; २० हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, गुटखा प्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
काशिनाथ शिंदे
बार्शी : प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध दारू विक्रीविरोधात बार्शी तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली. ११ ऑक्टोबर रोजी आगळगाव आणि धसपिंपळगाव येथे केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण २० हजार ३२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुटखा प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आगळगावात किराणा दुकानावर छापा; गुटखा-तंबाखू जप्त
आगळगाव येथील दशरथ किराणा स्टोअरवर ११ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत उदय संजय कोल्हे (वय २४, रा. आगळगाव) याच्याकडून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
यामध्ये केआर १०००, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि शॉट लक्झरी च्युइंग टोबॅको या पदार्थांचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत १७ हजार ७३४ रुपये आहे.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.
धसपिंपळगावात अवैध दारूविक्रीवर दोन कारवाया
पहिली कारवाई : हॉटेलच्या पाठीमागे दारूसाठा
धसपिंपळगाव येथील जिवलग हॉटेलच्या पाठीमागील आडोशाला ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४० वाजता पोलिसांनी कारवाई केली. यावेळी चंद्रकांत बलभीम पिंगळे (वय ५८) याच्याकडे देशी दारूच्या १८० मिलीच्या ११ सीलबंद बाटल्या आढळल्या. या दारूसाठ्याची किंमत ८८० रुपये असून, पोलिसांनी तो जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई : नदीशेजारील पत्राशेडमागे छापा
त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास नदीशेजारी मुन्ना भालेकर यांच्या पत्राशेडमागे पोलिसांनी दुसरी कारवाई केली. येथे संतोष अर्जुन धस (वय ५१) याच्याकडे देशी दारूच्या १२ बाटल्या आणि रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या तीन बाटल्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची एकूण किंमत एक हजार ७१० रुपये आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, आबासाहेब शिरगिरे, पोलीस अंमलदार सोमनाथ खांडेकर, अमृत खेडकर, गणेश दळवी, अमृता गुंड, प्रदीप चौधरी, महेश माने, ओमप्रकाश दासरे, रोहित बागल आणि अश्विनी साबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम
आगळगाव आणि धसपिंपळगावातील या कारवायांमुळे प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केल्याचे दिसून येते. संबंधित प्रकरणांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के आणि संबंधित तपासी अंमलदार करीत आहेत. अवैध धंद्यांविरोधात यापुढेही कायद्यानुसार कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे







