पोलिस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी कारवाई; दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास
काशिनाथ शिंदे
पुणे : न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणे, शांततेचा भंग करणे तसेच पोलिस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावून गोंधळ घालणे नऊ जणांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने नऊ जणांना दोषी ठरवत प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ८ येथे ३० ऑक्टोबर २०२६ रोजी समर्थ पोलीस ठाण्यातील आरसीसी प्रकरण क्रमांक ६२६४/२०२५ ची सुनावणी सुरू होती. यावेळी संबंधित आरोपी आणि त्यांच्या नातेवाइकांनी एकत्र येत न्यायालयात गोंधळ घातला. तसेच पोलिस अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावून न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला.
या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने नऊ जणांना दोषी ठरवून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
दोषी ठरलेल्यांची नावे : नामदेव उमाजी पवार (वय ५९), प्रशांत नामदेव पवार (वय ३२), शांता नामदेव पवार (वय ५२), सोपान विठ्ठल चव्हाण (वय ३३), अमित विलास पवार (वय ३२), आशा गोरखनाथ चव्हाण (वय ३१), सविता लहू चव्हाण (वय ३८), लहू नारायण चव्हाण (वय ४४) आणि प्रांजल लहू चव्हाण (वय २३).
न्यायालयीन कामकाजात अडथळा आणणे आणि कर्मचाऱ्यांना धमकावणे खपवून घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळाला आहे.






