स्टेशनच्या संरचनात्मक घटकांमध्ये कोणताही दोष नाही; पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांची माहिती
काशिनाथ शिंदे
पुणे : पीएमआर-०१ स्थानकात झालेल्या पाणीगळतीचे कारण पीएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानकाच्या प्रवेश संरचनेच्या छतावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपमध्ये तात्पुरता अडथळा निर्माण झाल्याने ही पाणीगळती झाल्याची माहिती पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली.
प्रवेश संरचनेच्या छताचा भाग खुल्या आकाशाखाली असल्याने पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या निचरा पाइपमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पावसाचे पाणी छतावर साचून त्याचा ओव्हरफ्लो झाला. हे पाणी स्थानकाचा मुख्य भाग (स्टेशन बॉक्स) आणि प्रवेश संरचना यांच्यामधील फटीतून झिरपून मेझानाइन स्तरावर दिसून आले.
दरम्यान, निचरा पाइपमधील तात्पुरता अडथळा दूर करण्यात आला असून, पावसाच्या पाण्याचा निचरा आता सुरळीत सुरू झाला आहे. ही गळती केवळ निचरा पाइपमधील अडथळ्यामुळे झाली असून, स्थानकाचा मुख्य भाग किंवा प्रवेश संरचनेच्या कोणत्याही संरचनात्मक घटकांमध्ये दोष नसल्याची खात्री पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
अशी माहिती पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली.






