वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान तीन वेळा भूमिगत केबलचे नुकसान; संबंधित कंत्राटदाराविरोधात बावधन पोलिसांत तक्रार
काशिनाथ शिंदे
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गाच्या कामादरम्यान अवघ्या काही दिवसांत तीन वेळा भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने महावितरणला लाखोंचा आर्थिक फटका बसला असून, हजारो वीजग्राहकांना वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागला आहे. वारंवार सूचना देऊनही वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापूर्वी काम सुरू ठेवल्याचा आक्षेप महावितरणने घेतला आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महामार्ग रुंदीकरण आणि सेवा रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिन्यांचे नियमानुसार स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने महावितरणकडून अंदाजपत्रक मंजूर करून आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मंजुरी घेतली आहे. मात्र, पुणे महापालिका हद्दीतील कामासाठी अशी परवानगी घेतलेली नसल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तीन वेळा केबल तोडल्या; महावितरणला आर्थिक फटका
महामार्गाच्या कामादरम्यान १६ ऑक्टोबर रोजी २२ केव्ही बेव्हर्ली फिडरची केबल तोडण्यात आली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी बिटवाइज चौक परिसरात २२ केव्ही निया फिडरच्या केबलचे नुकसान झाले. ३१ ऑक्टोबर रोजी पुन्हा केबल नादुरुस्त झाल्याची घटना घडली. सलग घडलेल्या या घटनांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवताना महावितरणची मोठी कसरत होत आहे. केबल दुरुस्ती आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांची गैरसोय आणि महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत आहे.
औंध, बाणेर, महाळुंगेला मोठा फटका बसण्याची शक्यता
या मार्गावरील २२ केव्ही उच्चदाब आणि लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांचे योग्य नियोजन न करता रस्त्याचे काम पूर्ण केल्यास भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास औंध, बाणेर आणि महाळुंगे परिसरातील मोठ्या संख्येने वीजग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करण्यापूर्वी वीजवाहिन्यांची जागा निश्चित करून त्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे गरजेचे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
काँक्रीटखाली केबल गाडल्यास दुरुस्तीचे आव्हान
रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत वीजवाहिन्या रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मध्यभागी येण्याची किंवा काँक्रीटखाली गाडल्या जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भविष्यात केबलमध्ये बिघाड झाल्यास दोष शोधणे आणि दुरुस्ती करणे अत्यंत कठीण होणार आहे. त्यासाठी काँक्रीटचा रस्ता खोदण्याची वेळ आल्यास दुरुस्तीला विलंब होऊ शकतो. परिणामी मोठ्या संख्येने वीजग्राहकांना दीर्घकाळ वीजपुरवठ्याविना राहावे लागू शकते. महामार्गासारखी महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारताना वीजपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याची भूमिका महावितरणने मांडली आहे.
कंत्राटदाराविरोधात बावधन पोलिसांत तक्रार
महावितरणच्या औंध उपविभागांतर्गत बाणेर शाखा कार्यालयाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी बावधन पोलीस ठाण्यात यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पूर्वसूचना देऊनही वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापूर्वी काम सुरू ठेवल्याचा आक्षेप तक्रारीत नोंदविण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित कंत्राटदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही महावितरणने केली आहे.






