पणदरे एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना; दागिने लुटून आरोपी पसार, माळेगाव पोलिसांची जलद कारवाई
काशिनाथ शिंदे
बारामती : पणदरे (ता. बारामती) येथील एमआयडीसी परिसरात घरात एकटी असलेल्या गर्भवती महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपीला माळेगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली तानाजी पवार या पणदरे एमआयडीसी परिसरात पतीसोबत राहत होत्या. त्यांचे पती तानाजी पवार कामावर गेल्यानंतर आरोपी गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे) याने घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे.
आरोपीने वैशाली पवार यांच्यावर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अत्याचाराला विरोध केल्यानंतर आरोपीने त्यांच्या डोक्यात हातोड्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून त्यांचा खून केल्याची कबुली आरोपीने चौकशीदरम्यान दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर आरोपीने महिलेच्या अंगावरील दागिने घेऊन तेथून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. उपलब्ध माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी गणेश माने याचा माग काढत अवघ्या दोन तासांत त्याला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे पणदरे परिसरात खळबळ उडाली असून, गर्भवती महिलेच्या निर्घृण हत्येमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून, गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास केला जात आहे.
माळेगाव पोलिसांच्या जलद कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यातील आरोपी अल्पावधीतच पोलिसांच्या ताब्यात आला आहे.







