आंबेडकर नगर परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार; हल्लेखोर फरार, पोलिसांचा तपास सुरू
काशिनाथ शिंदे
शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शनिवारी (दि. १९ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. आंबेडकर नगर परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने शिरूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास आंबेडकर नगर परिसरात ही घटना घडली. हरी गंगावणे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसराची पाहणी करण्यात आली.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तसेच अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
पहाटेच्या वेळी शहरातील वर्दळीच्या परिसरात गोळीबार होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याने शिरूर शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना तातडीने ताब्यात घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच हल्ल्याचे कारण, आरोपींची संख्या आणि इतर तपशील स्पष्ट होणार आहेत.







