विना क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ, बनावट आमदारांचा लोगो अन् भररस्त्यात स्टंटबाजी; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा दणका
काशिनाथ शिंदे
पिंपरी : शहरातील रस्त्यांवर वाहनांमधून धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासमोर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओच्या सनरूफवरून स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अमित डोळस सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध घेत कारवाई केली.
या स्टंटबाजीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची माहिती मिळवली. संबंधित स्कॉर्पिओला क्रमांक नसल्याचे तसेच वाहनावर आमदारांचा लोगो लावण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे धोकादायक स्टंट करून स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अमित डोळस सर यांनी दिला आहे. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विना क्रमांकाची वाहने, बनावट चिन्हे अथवा लोगो लावून वाहन चालविणे तसेच सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी करणे यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर यापुढे केवळ दंडात्मक कारवाई न करता, परिस्थितीनुसार गुन्हा दाखल करण्याचीही भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील स्टंटबाजांना चांगलाच धक्का बसला असून, ‘रस्ते हे स्टंटबाजीसाठी नाहीत’, असा संदेश पोलिसांनी दिला आहे.






