उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही; डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्याधुनिक विभागांचे उद्घाटन
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रुग्णसेवेबाबत अत्यंत संवेदनशील होते. शहरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, ही त्यांची भूमिका होती. त्यांचे हे स्वप्न पुढे नेण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य व्यवस्थेकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात ‘यशराज प्रसाद पाटील स्वयं प्रत्यारोपण केंद्र’, ‘भाग्यश्री व गोकूळमाता-बालविभाग’तसेच कृत्रिम गर्भधारणा आणि अंतर्दर्शिका केंद्राचे उद्घाटन रविवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू जयंत पवार, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव, यशराज पाटील, प्र-कुलगुरू एन. जे. पवार आणि अधिष्ठाता डॉ. ए. रेखा उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘‘आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयातून मोठ्या संख्येने नागरिकांना उपचार मिळत आहेत. आधुनिक उपचारपद्धती आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे विविध आजारांवरील उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाबरोबरच फुप्फुस प्रत्यारोपणासारखे गुंतागुंतीचे उपचारही येथे शक्य होत आहेत.’’
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘सामान्य नागरिकांना वेळेत, दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेले विभाग महत्त्वपूर्ण ठरतील. सरकारी आणि खासगी आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. आरोग्य सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर दर्जेदार आरोग्य सुविधा उभारण्यासाठी डी. वाय. पाटीलसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा.’’
पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा
नवीन अत्याधुनिक विभागांमुळे प्रत्यारोपण, माता-बाल आरोग्य, कृत्रिम गर्भधारणा तसेच अंतर्दर्शिका उपचारांच्या सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांना गुंतागुंतीच्या उपचारांसाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.






