सणासुदीच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचा धोका; ओटीपी, बँकिंग माहिती आणि अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करताना नागरिकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३च्या वतीने करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात लॉटरी, आकर्षक बक्षिसे, भेटवस्तू आणि विविध आमिषांचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमांतून जाळ्यात ओढले जाते. बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला ओटीपी, सीव्हीव्ही, पिन किंवा पासवर्ड सांगू नये. लॉटरी, इनाम किंवा आकर्षक भेटवस्तू मिळाल्याचा संदेश अथवा फोन आल्यास अशा आमिषांना बळी पडू नये.
तसेच अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून यूपीआयद्वारे पैसे पाठवू नयेत. अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद संकेतस्थळांवरून मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करणे टाळावे. संशयास्पद फोन, संदेश आणि व्हॉट्सॲप कॉलपासून सावध राहावे. ऑनलाइन खरेदी करताना केवळ विश्वासार्ह संकेतस्थळांचाच वापर करावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सायबर फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आल्यास वेळ न दवडता पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांनी स्वतःची आर्थिक आणि डिजिटल सुरक्षितता जपून सायबर गुन्हेगारांना संधी देऊ नये, असे आवाहन गुन्हे शाखा युनिट-३ने केले आहे.
सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि आनंदाने दिवाळी साजरी करा!






