‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ उपक्रमांतर्गत नामांकित उद्योग व कंपन्यांचा सहभाग; युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी
काशिनाथ शिंदे
पुणे: राज्यातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात एकाच दिवशी ५०० हून अधिक रोजगार मेळावे व निवड प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विविध तालुक्यांतील ३० शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी आपल्या परिसरातच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराची दारे
युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर उद्योग व विविध आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि शासन, उद्योग-आस्थापना तसेच रोजगार इच्छुक युवक-युवती यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
नामांकित उद्योगांचा सहभाग
पुणे जिल्ह्यात होणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये विविध नामांकित उद्योग, कंपन्या आणि आस्थापनांचा सहभाग राहणार आहे. संबंधित आस्थापनांकडून उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराच्या स्वरूपानुसार विविध रिक्त पदांसाठी निवड करण्यात येणार आहे.
यामुळे विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्यानुसार नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रोजगार इच्छुकांनी सहभागी व्हावे
पुणे जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवक-युवतींनी २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
युवकांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ हा याच प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण भाग असून, युवक आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
४८१, रास्ता पेठ, पुणे-११.
दूरध्वनी : ०२०-२६१३३६०६
रोजगारविषयक अधिक माहितीसाठी रोजगार महास्वयम् संकेतस्थळाला भेट द्यावी.







