१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा सेतू कॅम्प’; सौर योजनेचा अर्ज आणि बँक कर्जाची सुविधा एकाच छताखाली
काशिनाथ शिंदे
मुंबई: केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा सेतू कॅम्प’चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)’ योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणकडून तालुका पातळीवर विशेष ‘किओस्क’ उभारण्यात येणार आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी राज्यातील सर्व तालुका पातळीवर हे किओस्क उभारण्याचे निर्देश दिले आहेत. या किओस्कच्या माध्यमातून नागरिकांना घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत तसेच संबंधित योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे.
अर्ज भरण्याचे थेट प्रात्यक्षिक
किओस्कवर महावितरणचे कर्मचारी नागरिकांना सौर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्जाची प्रक्रिया कशी पूर्ण करावी, याचे थेट प्रात्यक्षिक देणार आहेत. त्यामुळे सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना अर्ज प्रक्रियेतील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
बँक कर्जासाठीही एकाच ठिकाणी सुविधा
या कॅम्पचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध बँकांचे प्रतिनिधीही किओस्कवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना घटनास्थळीच सौर यंत्रणेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याबरोबरच बँक कर्जासाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ तसेच ‘स्मार्ट’ योजनेशी संबंधित आवश्यक माहिती, अर्ज प्रक्रिया आणि कर्ज सुविधेबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासोबतच नागरिकांना उपलब्ध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, या उद्देशाने महावितरणकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी ‘सेवा सेतू कॅम्प’चा आणि उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






