निवृत्त अभियंते-अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी सल्लागार मंडळाचा प्रस्ताव; प्रत्येक महामंडळाला तीन ते पाच अभियंता गौरव पुरस्कार देण्याची घोषणा
काशिनाथ शिंदे
पुणे: महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाला अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी जलसंपदा विभागातील निवृत्त अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. यासाठी जलसंपदा विभागासह प्रत्येक महामंडळाच्या स्तरावर सल्लागार मंडळ स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित अभियंता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रकल्प समन्वय सचिव जयंत बोरकर, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुदर्शन पगार, तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे आदी उपस्थित होते.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर आवश्यक
राज्यातील शेती आणि जलव्यवस्थेसाठी जलसंपदा विभागातील अभियंते व अधिकाऱ्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याचा गौरव पुरस्काराच्या माध्यमातून होत आहे. मात्र, निवृत्तीनंतरही त्यांच्या अनुभवाचा लाभ विभागाला मिळत राहणे आवश्यक आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर कसा करता येईल, यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक महामंडळाला तीन ते पाच पुरस्कार
जलसंपदा विभागातील अभियंता गौरव पुरस्कारांची संख्या वाढविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना विखे पाटील यांनी प्रत्येक महामंडळासाठी किमान तीन पुरस्कार देण्याची सूचना केली. पुढील वर्षापासून प्रत्येक महामंडळासाठी तीन ते पाच पुरस्कार देण्यास मान्यता असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी आणि अभियंत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
धरणे बांधण्याबरोबर पाणी शेतापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे
जलसंपदा विभागातील अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्राच्या जलविकासाला मोठी चालना मिळाली आहे. केवळ धरणे उभारणे पुरेसे नसून धरणातील पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणे हेच विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
जलसंपदा विभाग हा राज्याच्या विकासाचा कणा आहे. पाइपद्वारे पाणी वितरण प्रणाली, ठिबक व तुषार सिंचनाचा विस्तार करून पाण्याची गळती आणि बाष्पीभवन कमी करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्याचबरोबर धरणांतील गाळ काढणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही भविष्यातील महत्त्वाची आव्हाने आहेत, असे महाजन यांनी नमूद केले.
अभियंता गौरव पुरस्कार हा केवळ व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण जलसंपदा विभागाच्या सामूहिक कार्याचा गौरव आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी आणखी वाढते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘सॉफ्ट बाबीं’वर भर
जलप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी भूसंपादन, वन व पर्यावरण मंजुरी तसेच पुनर्वसनाच्या बाबींचे प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. या बाबी बांधकामाच्या कामासोबत समन्वयाने पूर्ण केल्यास प्रकल्प रखडण्याचे प्रमाण कमी होईल, असे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
जलसंपदा विभागातील सुमारे सहा हजार तांत्रिक मनुष्यबळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अभियंता पुरस्कारांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, जलवापर संस्थांचे प्रशिक्षण, सिंचन वाढ आणि लोकसहभाग यासाठी नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली. तसेच ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४’मध्ये महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
२०१९ ते २०२४च्या पुरस्कारार्थींचा गौरव
या सोहळ्यात २०१९ ते २०२४ या कालावधीतील वैयक्तिक आणि सांघिक अभियंता गौरव पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला.
२०१९ : प्रकाश बाबूराव भोसले, प्रवीण पांडुरंग पारस्कर तसेच सांगली पाटबंधारे मंडळ.
२०२० : निलेश गुरुनाथ भोईर, सचिन पुंडलिक पवार, मंगेश त्र्यंबकराव त्रिपिटे तसेच जिगाव प्रकल्प, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ.
२०२१ : समाधान धोंडीबा सर्पेलवार, अरुण रामचंद्र नाईक, सायली राजेंद्र पाटील, प्रमोद पुंजाजी महाले, विजय हरी पाटील तसेच मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक.
२०२२ : संजीव दगडू चोपडे, गोकुळ श्रावण महाजन, प्रवीण वसंतराव देशमुख, धनंजय महादेव कोकरे, जयपाल संजय चौरासिया तसेच रत्नागिरी पाटबंधारे मंडळ आणि नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक.
२०२३ : अजित भारत गौड तसेच जल हवामान आधार सामग्री प्रक्रिया विभाग, नाशिक.
२०२४ : अनिता उदय पराते आणि राजरत्न महादेवराव रणदिवे यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास जलसंपदा विभागातील अधिकारी, अभियंते तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.







