कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
काशिनाथ शिंदे
पुणे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, तसेच लेझर लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोत आणि लेझर लाईटचा वापर केला जातो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करताना कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा गणेश मंडळ आढळून आल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ मधील तरतुदींनुसार तसेच प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे गणेश मंडळे, आयोजक आणि संबंधितांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याने विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करताना मंडळांनी याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







