ॲड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती; पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि वाद्यांनी मिरवणुकीला रंगत
काशिनाथ शिंदे
पुणे : भटके-विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट ‘भटके-विमुक्त दिना’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भटके-विमुक्त राज्यस्तरीय परिषद २०२६ ला पुण्यात उत्साहात सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होत आहे. यावेळी भटके-विमुक्त समाजबांधवांच्या वतीने ॲड. आंबेडकर यांचे संविधानाच्या प्रस्तावनेची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
परिषदेच्या पार्श्वभूमीवर सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक सभागृहापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला.
मिरवणुकीत भटके-विमुक्त समाजातील पारंपरिक लोककलावंतांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. पारंपरिक वाद्ये, नृत्य आणि संगीताच्या सादरीकरणाने मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणातून समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधोरेखित झाली.
मिरवणुकीनंतर साने गुरुजी स्मारक सभागृहात राज्यस्तरीय परिषदेची सुरुवात झाली. भटके-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका मांडणे, हा परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासह त्यांच्या हक्कांसाठी पुढील दिशा निश्चित करण्यासाठी परिषदेत विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव पुण्यात दाखल झाल्याने परिषदेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.







