थेरगावच्या सोहेल खानचे एमपीएससी परीक्षेत यश; मंत्रालयातील महसूल सहायक पदाला गवसणी
काशिनाथ शिंदे
पिंपरी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, याचा प्रेरणादायी आदर्श थेरगाव येथील सोहेल दिलदार खान याने घालून दिला आहे. हातगाडीवर भांडी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या कष्टांना सलाम ठरवत सोहेलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्याची मंत्रालयातील महसूल सहायक पदावर निवड झाली आहे.
सोहेलचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेखापूर आहे. त्याचे वडील गेल्या ४५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही त्यांनी हातगाडीवर भांडी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मात्र, आर्थिक अडचणींची झळ आपल्या मुलांना लागू नये, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नातेवाईकांचा विरोध असतानाही तीनही मुलांना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला.
चिंचवडमध्ये जन्मलेल्या सोहेलचे बालपण थेरगावातील जय मल्हारनगर परिसरात गेले. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भिकोबा तांबे शाळेत झाले. त्यानंतर आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदविका, तर पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून याच विषयातील पदवी त्याने पूर्ण केली.
कोरोना काळात सोहेलने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीच्या प्रयत्नांत अपयश आले; मात्र त्याने हार मानली नाही. आई-वडिलांचा विश्वास आणि खंबीर पाठिंबा त्याच्या पाठीशी होता. घरातच अभ्यासाची स्वतंत्र व्यवस्था करून त्याने दररोज सात ते आठ तास सातत्याने अभ्यास केला. अखेर त्याच्या मेहनतीला यश मिळाले आणि एमपीएससीच्या माध्यमातून मंत्रालयातील महसूल सहायक पदावर त्याची निवड झाली.
सोहेलच्या यशात त्याच्या कुटुंबाचेही मोठे योगदान आहे. त्याच्या बहिणीने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून, भावाने एम.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. दोघेही सध्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून तिन्ही भावंडांनी उच्चशिक्षण घेत स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘सातत्य महत्त्वाचे; जिद्द आणि मेहनत असेल तर यश निश्चित!’
“हलाखीची परिस्थिती शिक्षणाच्या माध्यमातूनच बदलता येते. अपयशाला घाबरून न जाता त्याचा सामना केला पाहिजे. किती तास अभ्यास केला यापेक्षा अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे. जिद्द आणि मेहनत असेल, तर यश निश्चित मिळते,” असा प्रेरणादायी संदेश सोहेल दिलदार खान याने दिला.







