प्रगती’ प्रकल्पातून ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक यंत्रसामग्री व निधीला हिरवा कंदील; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
काशिनाथ शिंदे
पिंपरी पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या रुग्णालयासाठी तब्बल ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, पायाभूत सुविधा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाची क्षमता आणखी वाढवून ४०० खाटा वाढविण्याची आग्रही मागणी असून, त्यासाठीही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांना माफक दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयामुळे त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, गंभीर आजारांवरील उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
‘प्रगती’ प्रकल्पासाठी ४ हजार २५० कोटींची तरतूद
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक नागरिककेंद्रित करण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ‘प्रगती’ आरोग्य सुधारणा प्रकल्प राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तब्बल ४ हजार २५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून राज्यातील जिल्हा रुग्णालयांना आधुनिक स्वरूप देण्यावर भर दिला जाणार आहे.
केवळ पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी जिल्हा रुग्णालयांना ‘मल्टीस्पेशालिटी हब’ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. रुग्णांना विविध आरोग्य सुविधा वेळेत आणि योग्य पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, तसेच उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावा, यावर भर दिला जाणार आहे. आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, डिजिटल आरोग्य सुविधा, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि वेळेवर निदानाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
गंभीर आजारांवरील उपचार एकाच छताखाली
‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय कोल्हापूर व नांदेड येथे ५०० खाटांची, तर नागपूर व लातूर येथे ३०० खाटांची जिल्हा रुग्णालये उभारण्याचे प्रस्तावित आहे. या पाच रुग्णालयांसाठी एकूण २ हजार ४३० पदे निर्माण करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आमदार शंकर जगताप यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी आरोग्य केंद्रात रूपांतर करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
नवीन सुविधेमुळे हृदयरोग, कर्करोग, मेंदू व मज्जासंस्थेचे विकार, मूत्रपिंडविकार यांसह विविध गंभीर आजारांवर उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयांचा आधार घेण्याची किंवा उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार आहे.
“जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी हा सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा रुग्णालय आधुनिक, सक्षम आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण सुपरस्पेशालिटी केंद्र म्हणून विकसित होत आहे. पदनिर्मिती, निधी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, तो निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी पुढेही प्रयत्नशील राहणार आहे.”
– शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ







