पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत ४ सप्टेंबरला एकाच वेळी सांस्कृतिक कार्यक्रम
काशिनाथ शिंदे
पुणे, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त त्यांच्या अध्यात्मिक, सामाजिक आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांमध्ये शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एकाच वेळी हा कार्यक्रम होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक साहित्यनिर्मितीने, अध्यात्मिक विचारांनी आणि समाजप्रबोधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक जीवनावर अमीट ठसा उमटविला आहे. ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘अमृतानुभव’ या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्मज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले.
समता, मानवता आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देत आहे. त्यांच्या जीवनकार्याचा आणि संतपरंपरेतील योगदानाचा परिचय नव्या पिढीसह जनसामान्यांना करून देण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ या कार्यक्रमाची संकल्पना करण्यात आली आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, संतविचार, भक्तीपरंपरा तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन रसिकांना घडणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, संतांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची व्यापक ओळख निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
पुणे महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत एकाच वेळी कार्यक्रम आयोजित करून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हा उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
‘ज्ञान माऊली’ कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.







