काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड
पिंपरी : थायलंडमधील ज्युनियर आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दर्पण चौधरी आणि सुमितकुमार यांनी सुवर्णपदकांची कमाई करत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला. पैलवान अमोल बुचडे कुस्ती अकादमीच्या या दोन्ही मल्लांनी दमदार कामगिरी करत अकादमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सुमितकुमारने २० वर्षांखालील ७० किलो फ्रीस्टाईल गटात किर्गिझस्तानच्या मल्लावर ९-७, तुर्कस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर ११-० असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या मल्लाला १३-७ अशा फरकाने पराभूत करून त्याने कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर १५ वर्षांखालील ६२ किलो ग्रीको-रोमन गटात दर्पण चौधरीने थायलंडच्या मल्लाला १०-०, कझाकिस्तानच्या मल्लाला ६-१ ने नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत ताजिकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर ५-० अशी मात करून त्यानेही सुवर्णपदकावर नाव कोरले.
गेली सहा वर्षे हे दोन्ही मल्ल रुस्तम-ए-हिंद व महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारुंजी येथील अकादमीत सराव करत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत बालेवाडी येथील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्येही ते प्रशिक्षण घेत आहेत. या यशाबद्दल क्रीडा विभागासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले.
राज्य शासनाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या हाय परफॉर्मन्स सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळत असून, भविष्यात महाराष्ट्राचे अधिकाधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील, असा विश्वास पैलवान अमोल बुचडे यांनी व्यक्त केला.
——————







