काशिनाथ शिंदे : पिंपरी
सायबर फसवणुकीतून मिळालेली तब्बल २२ लाख ७४ हजार रुपयांहून अधिक रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतःचे बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देशातील सात नागरिकांची फसवणूक करून मिळालेली रक्कम या खात्यावर जमा झाल्याचे तपासात उघड झाल्याने सायबर गुन्ह्यांच्या मोठ्या रॅकेटकडे पोलिसांचा तपास वळला आहे.
या प्रकरणी प्रतिक मोहन घुले (वय २२, रा. बोपखेल) आणि श्रीतेज नाना बुलाखे (वय २१, रा. दिघी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई वैभव गोरख काकडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून दिले. प्रतिक घुले यांच्या नावावरील येस बँकेच्या खात्यावर देशातील सात नागरिकांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित २२लाख ७४ हजार ६४० रुपये ४८ पैसे जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तपासात श्रीतेज बुलाखे याने प्रतिक घुले याला त्याचे बँक खाते वापरण्यास देण्यास सांगितले होते. त्याबदल्यात २५ हजार रुपयांचे कमिशन देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित खाते सायबर फसवणुकीतून आलेल्या पैशांच्या व्यवहारासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.
आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता, ते आणि त्यांचे इतर साथीदार विविध व्यक्तींशी संपर्क साधून अशाच प्रकारे सायबर फसवणुकीसाठी बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असून पोलिसांकडून इतर बँक खात्यांचीही पडताळणी केली जात आहे.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६(सी) आणि ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.







