गुणवंत शिक्षिका मनीषा नेवसे यांचा लामजेवाडीत सत्कार; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक
काशिनाथ शिंदे
बारामती : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या लामजेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका मनीषा मनोज नेवसे यांना बारामती तालुका आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.
बारामती येथील ग. दि. मा. सभागृहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मनीषा नेवसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानामुळे लामजेवाडीच्या शैक्षणिक क्षेत्राच्या योगदानालाही गौरव प्राप्त झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धुमाळ यांनी नेवसे यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही भर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक सुखदेव वाघमारे यांनी मनीषा नेवसे यांच्या आजवरच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत, विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला दिलेले प्रोत्साहन आणि शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांना हा सन्मान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढेही त्यांच्या कार्याची जिल्हास्तरावर दखल घेतली जावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
या वेळी माजी सरपंच शितल धुमाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल निगडे, गोपाळ धुमाळ, प्रवीण धुमाळ, ज्ञानदेव बर्गे, गणेश बर्गे, शरद निगडे, ज्ञानेश्वर साळुंखे, हरिभाऊ बर्गे, अंगणवाडी सेविका प्रियंका सूर्यवंशी, अंगणवाडी मदतनीस निर्मला सूर्यवंशी, ताराबाई बर्गे, निशा शेलार, माधुरी बर्गे, लक्ष्मी शेलार, मोनाली बर्गे, सुनीता शेलार, स्वाती सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







