काळी काच, मॉडिफाय सायलेन्सर अन् फॅन्सी नंबर प्लेटवरही कारवाई; आमदार असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न उघड
काशिनाथ शिंदे
पिंपरी : स्वतः किंवा कुटुंबातील कोणीही महाराष्ट्र विधानसभा सदस्य नसताना आपल्या वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ असा लोगो, अशोक स्तंभाचे चिन्ह आणि ‘आमदार’ असा उल्लेख असलेले स्टिकर लावून आमदार असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकावर पिंपरी वाहतूक विभागाने कायदेशीर कारवाई केली. या कारवाईमुळे वाहनांवर बनावट पदनाम व शासकीय चिन्हांचा गैरवापर करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
ही कारवाई दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पिंपरी येथील साई चौकाजवळील वाहनतळ परिसरात करण्यात आली. मयुर सुधीर शेटे (रा. निगडी) हा महिंद्रा कंपनीची थार (क्र. एमएच १४ एलए २१५७) घेऊन आढळून आला.
या थारच्या काचांना काळ्या रंगाची फिल्म लावण्यात आली होती. तसेच वाहनाच्या पुढील व मागील काळ्या काचेवर पांढरा-हिरव्या रंगातील वर्तुळाकार लोगो चिकटविण्यात आला होता. त्यावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’, अशोक स्तंभाचे चिन्ह आणि ‘आमदार’ असा मजकूर होता. स्वतः किंवा कुटुंबातील कोणीही आमदार नसताना आमदार असल्याचा भास निर्माण व्हावा, या उद्देशाने हा लोगो वाहनावर लावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याशिवाय वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट असल्याचेही आढळून आले. काळ्या काचा, वाहनातील बदल करण्यात आलेला सायलेन्सर तसेच फॅन्सी नंबर प्लेट अशा विविध नियमभंगांप्रकरणीही वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २०५, तसेच सी.एम.व्ही.आर. कलम १००(२), मोटार वाहन कायदा कलम १७७ आणि सी.एम.व्ही.आर. कलम ५१/१७७ अन्वये पिंपरी पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनांवर बनावट शासकीय पदनाम, चिन्हे अथवा विशेषाधिकार दर्शविणारे स्टिकर लावून सामान्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
या कारवाईत पिंपरी वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी प्रभावी कारवाई केली.







