देशभरातील खेळाडूंचा सहभाग; पिंपळे सौदागरच्या क्लायम्बिंग वॉलवर १५ नोव्हेंबरपर्यंत रंगणार कौशल्याचा थरार
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपळे सौदागर येथील योगा उद्यानातील क्लायम्बिंग वॉलवर आयोजित करण्यात आलेल्या ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिप २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात उद्घाटन झाले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली आहे.
या उद्घाटनप्रसंगी नगरसदस्य शत्रुघ्न बाप्पू काटे, नाना काटे, अनिता काटे, कुंदा भिसे, देवांग नाईक, के. सरस्वती, श्रीकृष्ण कडुस्कर यांच्यासह विविध भागांतून सहभागी झालेले खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र क्लायम्बिंग असोसिएशन आणि इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील खेळाडूंना आपले कौशल्य, चपळता, शारीरिक क्षमता आणि क्रीडा नैपुण्य दाखविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन होणे ही शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांमुळे शहराची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्याबरोबरच स्थानिक खेळाडूंनाही प्रेरणा मिळते. पिंपळे सौदागर येथील जागतिक दर्जाची क्लायम्बिंग वॉल भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनासाठीही महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शहरात क्रीडा संस्कृती रुजविणे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा आणि राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे.






