काशिनाथ शिंदे
पिंपरी : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाने १५ जुलैपर्यंत शालेय साहित्य वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर मनसेने नियोजित ठिय्या आंदोलन स्थगित केले.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भालेराव यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर भालेराव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.२) शिक्षण विभागाच्या उपआयुक्त ममता शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मनसेचे मिलिंद सोनवणे, भाऊ नाईक, हनीफ शेख आणि चंद्रकांत निशिगंध उपस्थित होते. दरम्यान, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण झाल्यानंतर अंदाजे १५ जुलैपर्यंत डीबीटीद्वारे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल, असे उपआयुक्त शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील वर्षापासून जानेवारी महिन्यापासूनच निविदा प्रक्रिया सुरू करून साहित्य वाटपात विलंब होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे मनसेने नियोजित ठिय्या आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
