उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांकडून तयारीचा आढावा; महिला, बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य, विसर्जनस्थळी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश
काशिनाथ शिंदे
पुणे: पुण्यातील गणेशोत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने यंदाचा उत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी रेल्वे, बस तसेच सार्वजनिक वाहतुकीने मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात दाखल होतात. त्यामुळे रेल्वेगाड्या व बसच्या वेळेनुसार गर्दीचा वाढता ताण लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रणा तैनात करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
गणेश मंडळांकडून विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी स्वतंत्र वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करावे. वाहतुकीतील बदल, पर्यायी मार्ग आणि वाहनतळांची माहिती नागरिकांना वेळेत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिला, बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
गणेशोत्सवाच्या काळात महिला, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. गर्दीच्या ठिकाणी मंगळसूत्र चोरी, पाकीटमारी यांसारख्या घटना रोखण्यासाठी २४ तास पोलीस गस्त आणि प्रभावी बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पवार यांनी दिले.
मागील वर्षी आलेल्या अडचणींचा आढावा घेऊन यंदा आवश्यक सुधारणा कराव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवा
गणेश मंडळांसह ग्रामीण भागातील नागरिकांना गणेशोत्सव काळात अखंडित वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
विसर्जनस्थळी स्वच्छता, प्रकाश अन् सुरक्षेवर भर
गणेश विसर्जनाच्या दिवशी विविध विसर्जनस्थळी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जन कुंड आणि निर्धारित विसर्जनस्थळी पुरेशी प्रकाशव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता ठेवावी. विसर्जन सुरू असतानाच संबंधित ठिकाणी सातत्याने स्वच्छता केली जावी, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला साजेसे वातावरण निर्माण करून सर्वांनी शांततेत आणि उत्साहात हा उत्सव साजरा करावा. नागरिकांना त्रास होणार नाही, पारंपरिक पद्धतीला प्राधान्य राहील आणि उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.
महापालिका प्रशासन सज्ज
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, सुलभ शौचालये, अतिरिक्त प्रकाशव्यवस्था, सार्वजनिक ध्वनिक्षेपक, सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथकांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
मेट्रोचीही विशेष तयारी
गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष नियोजन केले आहे. मंडई स्थानकाचा वापर केवळ बाहेर पडण्यासाठी करावा, तर गणपती दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांनी भूमिगत मार्गावरील कसबा पेठ किंवा स्वारगेट स्थानकांचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तयारीची माहिती अनुक्रमे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सादरीकरणाद्वारे दिली. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या विभागाच्या तयारीची माहिती बैठकीत दिली.






