काशिनाथ शिंदे
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती आवश्यक असलेल्या नागरिकांना आपले नाव अद्ययावत करण्याची संधी मिळणार आहे.
मतदार यादीतील दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव किंवा अन्य तपशीलात दुरुस्ती तसेच अपात्र अथवा आवश्यकतेनुसार नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत काही पात्र नागरिकांची नावे गैरहजर, स्थलांतर किंवा अन्य कारणांमुळे समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. अशा नागरिकांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी या कालावधीत दावा दाखल करता येणार आहे.
तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही मतदार यादीत नाव नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनीही या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिला, दिव्यांगांसह सर्व पात्र नागरिकांसाठी विशेष प्रयत्न
मतदार यादीतील महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक तसेच इतर पात्र नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. नागरिकांना नाव नोंदणी, नोंदीतील दुरुस्ती किंवा नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही शिबिरांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या विशेष शिबिरांसाठी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले आहे.






