१२ ते २६ सप्टेंबरदरम्यान १२ प्रमुख मार्गांवर २४ तास वाहतूक बंदी; अत्यावश्यक सेवांना वगळले
काशिनाथ शिंदे
पुणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशमूर्ती विसर्जन होईपर्यंत २४ तास हे निर्बंध लागू राहणार आहेत.
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील कलम ११५, ११६(१)(ए)(बी), ११६(४) व ११७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून याबाबत आदेश जारी केला आहे.
‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
शास्त्री रोड : सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक
टिळक रोड : जेधे चौक ते अलका चौक
कुमठेकर रोड : शनिपार ते अलका चौक
लक्ष्मी रोड : संत कबीर चौक ते अलका चौक
केळकर रोड : फुटका बुरुज ते अलका चौक
बाजीराव रोड : पुरम चौक ते गाडगीळ पुतळा
शिवाजी रोड : गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
कर्वे रोड : नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
फर्ग्युसन कॉलेज रोड : खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक
जंगली महाराज रोड : स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक
सिंहगड रोड : राजाराम ब्रिज ते सावरकर चौक
गणेश रोड/मुदलियार रोड : पॉवर हाऊस दारुवाला ते जिजामाता चौक, तसेच फुटका बुरुज चौक परिसर
अत्यावश्यक सेवांना निर्बंधातून वगळले
वाहतूक निर्बंधांमधून अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने आणि गणेश देखावे वाहून नेणारी वाहने यांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात मध्यवर्ती पुण्यात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळणे, भाविकांची सुरक्षितता राखणे आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडणे यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.






