१७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी; स्ट्रॉबेरी लागवड किटसाठी ९० टक्के अनुदान
काशिनाथ शिंदे
पुणे: आदिवासी शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत स्ट्रॉबेरी प्राथमिक लागवड किट तसेच शेततळे निर्मिती व अस्तरीकरणासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. आंबेगाव, जुन्नर, राजगुरुनगर आणि मावळ तालुक्यातील पात्र आदिवासी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत स्ट्रॉबेरी लागवड किटसाठी तब्बल ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच अस्तरीकरणासह नवीन शेततळे तयार करणे आणि अस्तित्वात असलेल्या शेततळ्याचे अस्तरीकरण करण्यासाठी शासनाच्या निर्धारित मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्ट्रॉबेरी लागवड अनिवार्य
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आदिवासी शेतकरी असणे आवश्यक आहे. यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून स्ट्रॉबेरी लागवडीचा लाभ घेतलेला नसावा. विशेष म्हणजे, शेततळे किंवा अस्तरीकरणाचा लाभ घेण्यासाठी स्ट्रॉबेरी प्राथमिक लागवड हा घटक अनिवार्य करण्यात आला आहे.
स्ट्रॉबेरी लागवडीसोबत अस्तरीकरणासह नवीन शेततळे निर्मिती किंवा अस्तित्वात असलेल्या शेततळ्याचे अस्तरीकरण यापैकी एका घटकाचा लाभ घेता येणार आहे.
कामे वेळेत पूर्ण करणे बंधनकारक
लाभार्थी निवड झाल्यानंतर संबंधित कामे तांत्रिक निकषांनुसार आणि विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. शासनाने मंजूर केलेल्या मापदंडापेक्षा अधिक होणारा खर्च संबंधित लाभार्थ्यालाच करावा लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र किंवा दाखला, बँक पासबुकची प्रत आणि हमीपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.






