पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकांचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी करत तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या विरोधात व्यापक अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘तंबाखूमुक्त पुणे–व्यसनमुक्त पुणे’चा संदेश
गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये तंबाखू व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणारे फलक, पोस्टर, बॅनर आणि घोषवाक्यांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेऊन युवकांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि युवकांच्या माध्यमातून हा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, ‘तंबाखूमुक्त पुणे–व्यसनमुक्त पुणे’ या संदेशाचा व्यापक प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थी, स्वयंसेवकांना अधिकृत ओळखपत्रे
या अभियानात सहभागी होणारे विद्यार्थी, स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने अधिकृत ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे जनजागृती उपक्रमात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र ओळख मिळणार आहे.
बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री पाटील, भाई प्रतिष्ठानचे डॉ. शंतनु जगदाळे, लखन वाघमारे, जिजाऊ फाऊंडेशनच्या ज्योती ढमाळ यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
“व्यसनमुक्त महाराष्ट्र” अभियानाला बळ देण्यासाठी सर्व संबंधित विभाग, संस्था आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले.






