पाच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; १२०० चौरस मीटर बांधकामाचे निष्कासन
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार, फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण पाच अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून, सुमारे १२०० चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकाम हटविण्यात आले.
ही कारवाई फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. यावेळी उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल्ल भोकरे, ऐश्वर्या मासाळ, सूरज माने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान सहा अतिक्रमणविरोधी पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ५० जवान, महापालिकेचे दोन मजूर आणि १० कंत्राटी मजूर सहभागी झाले होते. बांधकामे निष्कासित करण्यासाठी दोन ट्रॅक्टर, दोन ब्रेकर आणि दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला.
महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांविरोधात करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले







