काशिनाथ शिंदे
वाळवा : घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची… आई-वडील आणि चुलते रोजंदारी करून कुटुंबाचा गाडा ओढतात… राहायला पत्र्याचे, शेणामातीचे छोटेसे घर… मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका मुक्या पैलवानाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. वाळवा तालुक्यातील अक्षय पोपट पवार या युवा पैलवानाची परदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अक्षयला बोलता येत नाही; मात्र त्याची कुस्तीतील कामगिरीच त्याची ओळख बनली आहे. गळ्यात पदकांची माळ आणि डोळ्यांत मोठे स्वप्न घेऊन तो आंतरराष्ट्रीय आखाड्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अक्षयच्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर त्याच्या जिद्दीला आणखी मोठे महत्त्व प्राप्त होते. कुटुंबातील सदस्य रोजंदारी करून उदरनिर्वाह करतात. गळके आणि अत्यंत साधे घर असतानाही अक्षयने परिस्थितीसमोर हार मानली नाही. मेहनत, जिद्द आणि कुस्तीवरील प्रेमाच्या जोरावर त्याने अनेक पदके मिळवत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर धडक मारली आहे.
व्हीआयएसवर्ल्ड मराठीचे नारायण सांगार सर यांनी अक्षयची कहाणी समाजासमोर आणली आहे. हा मुलगा म्हणजे ‘खरं सोनं’ असून तो परदेशातून गोल्ड मेडल घेऊन येईल आणि भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अक्षयला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी परदेशात जाण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. तसेच त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षित घराचीही आवश्यकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या होतकरू पैलवानाला आर्थिक मदत करावी, अशी भावनिक विनंती करण्यात आली आहे.
गरिबीच्या अंधारातही जिद्दीची मशाल पेटवत अक्षयने यशाचा मार्ग शोधला आहे. बोलता येत नसले तरी त्याच्या कर्तृत्वाची भाषा संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे. अक्षयच्या आंतरराष्ट्रीय विजयासाठी आता समाजानेही त्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
‘गरीब घरातील मुक्या पैलवानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली; पण परदेशवारीसाठी मदतीची आस…’ अशी हृदयस्पर्शी परिस्थिती अक्षयसमोर उभी आहे.
चांगभलं जोतिबाच्या नावानं… अक्षयच्या गळ्यात परदेशातून सुवर्णपदक पडो आणि भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय आखाड्यात अभिमानाने फडकू दे, हीच सदिच्छा!







