काशिनाथ शिंदे
पिंपरी : भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा तब्बल १० हजार ५१४ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
रामबली लल्लान प्रसाद (वय २६, रा. तुळजाभवानी हॉटेलच्या पाठीमागे, शिवरोड, जाधववाडी, चिखली; मूळ रा. बहराईच, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक शनिवारी (दि. २२) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार युवराज बिराजदार आणि श्रीधन इचके यांना मिळालेल्या माहितीनुसार, शिवरोड, जाधववाडी येथे कारवाई करण्यात आली. त्यावेळी रामबली प्रसाद हा प्रतिबंधित पानमसाला व गुटखा विक्री करताना आढळून आला.
पोलिसांनी त्याच्याकडून विविध कंपन्यांचा १०,५१४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील कलम ३०(२)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस हवालदार युवराज बिराजदार, श्रीधन इचके आणि पोलीस शिपाई दिलीप राठोड यांच्या पथकाने केली.







