काशिनाथ शिंदे
पिंपरी : कलाकार, क्रीडापटू आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय मिळाला पाहिजे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींचा सन्मान केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जबाबदारीने काम करीत आहेत. कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झाले असताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची कुटुंबाप्रमाणे जबाबदारी घेतली. शिवसेनेने आधी काम केले आणि त्यानंतर मत मागितले; मात्र विरोधकांना निवडणुकीच्या वेळीच ‘लाडकी बहीण’ आठवली, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘उद्धव श्री पुरस्कार २०२६’ चे वितरण खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी रक्तदान आणि आरोग्य शिबिरांची चळवळ सुरू केली. ‘जिथे संकट, तिथे शिवसेना’ या भूमिकेतून सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना काम करीत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार हा केवळ पुरस्कार नसून सामाजिक कार्याचा सन्मान आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की, सध्या राजकारणात पुढे पुढे करणाऱ्यांचे दिवस आहेत, तर प्रामाणिक माणसांच्या पदरी उपेक्षा पडत आहे. मात्र शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे. महाराष्ट्रातील ३६ हजार उद्योग बंद पडणे ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. उद्योजकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना त्रास दिला जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक कराचा बोजा लादला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करणारे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा पूर्ण विश्वास असल्याचेही विनायक राऊत यांनी सांगितले.
शहरप्रमुख चेतन पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना पुरस्कार हा सामाजिक कार्याचा सन्मान असल्याचे सांगितले. कोरोना काळासारख्या जोखमीच्या परिस्थितीतही अनेकांनी पुढे येऊन आपले कर्तव्य बजावले, असे त्यांनी नमूद केले.
‘उद्धव श्री पुरस्कार २०२६’ ने डॉ. संतोष लाटकर, डॉ. रोहन काटे, प्रा. तुकाराम पाटील, काशिनाथ नखाते, प्रीती वैद्य, चांद पाशा अहमद हुसेन तांबोळी, पै. योगेश्वर तापकीर, भाग्यश्री मोरे, रामदास काटे, डॉ. संजीव कुमार पाटील, शौर्या भरणे आणि रियाज शेख यांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, पिंपरी-चिंचवड आणि पिंपळे निलख परिसरातील युवक-युवतींनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार संजय राऊत यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमास माजी आमदार गौतम चाबुकस्वार, रोमी संधू, मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख लतिकाताई पाष्टे, सुशीला पवार, विजय सुळे, गजानन थरकुडे, सुनील सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, ज्योती भावे, सचिन मगर, नितीन घोलप आदी उपस्थित होते.
फुटीर गट न्यायालयात युक्तिवाद करू शकत नाही : संजय राऊत
शिवसेना पक्षफुटीप्रकरणी आमच्या पक्षाचा न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. फुटीर गट सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करू शकत नाही; ते केवळ आपले म्हणणे मांडू शकतात. ते सुरतला कसे गेले, गुवाहाटी आणि गोव्याला कसे गेले, तसेच या संपूर्ण प्रकरणात काय घडले, हे ते न्यायालयासमोर सांगू शकतात; मात्र त्यांना युक्तिवाद करता येणार नाही, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.







