‘विशेषसखोलपुनरीक्षण कार्यक्रम’ांतर्गत ७ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष जनजागृती शिबिरे
काशिनाथ शिंदे
पुणे, जिल्ह्यातील मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत असून, एएसडीडी यादीतील जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी अंतिम मतदार यादीत व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत विशेष जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे युवक-युवती, तसेच तृतीयपंथीय व्यक्ती, अल्पसंख्यांक समाजातील नागरिक, महिला आणि दिव्यांग नागरिक यांची मतदार यादीत नोंदणी व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल २८ लाख ६६ हजार ४६१ मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार अशा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदारांमध्ये जनजागृती करून पात्र नागरिकांनी आवश्यक ती माहिती व कागदपत्रे सादर करावीत, यासाठी विशेष शिबिरांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असलेल्या पात्र नागरिकांची नावे अंतिम यादीत समाविष्ट व्हावीत, तसेच नव्याने पात्र ठरणाऱ्या नागरिकांची नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप) अंतर्गत ही व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करावी आणि आवश्यक असल्यास मतदार नोंदणी अथवा दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.







