चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश; फ्लिटगार्ड इंडियाच्या सीएसआर निधीतून ३२ आसनी बस उपलब्ध
काशिनाथ शिंदे
मुळशी : मुठा खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना भेडसावणाऱ्या प्रवासाच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. श्री म्हसोबा देवस्थान, खारवडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून आणि फ्लिटगार्ड इंडिया यांच्या सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांसाठी ३२ आसनी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मुठा खोऱ्यातील विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयाचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
मुठा खोऱ्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी पुरेशा सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रवासाची गैरसोय आणि आर्थिक भार यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री म्हसोबा देवस्थानच्या वतीने हा प्रश्न सातत्याने लावून धरण्यात आला.
देवस्थानच्या पाठपुराव्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना आणि फ्लिटगार्ड इंडियाच्या सामाजिक बांधिलकीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यातून ३२ आसनी बस विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली. ही बस श्री म्हसोबा चरणी अर्पण करण्यात आली.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या मार्गात आर्थिक अडचणींबरोबरच प्रवासाची गैरसोयही मोठा अडथळा ठरू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुलभ आणि मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या बससेवेमुळे मुठा खोऱ्यातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळा-महाविद्यालयात जाण्यास मोठा आधार मिळणार आहे. ‘प्रवासाची अडचण नाही, शिक्षणाला अडथळा नाही’ असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
यावेळी फ्लिटगार्डचे संजय कुलकर्णी, सीएसआर प्रमुख प्रियंका चव्हाण, श्री म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुराताई भेलके, उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, सचिव शंकर मारणे, खजिनदार लक्ष्मण मारणे, विश्वस्त विलास सोनावणे, विष्णुपंत जोगावडे, संभाजी गावडे, मारुती माने, तेजस जोगावडे, हर्षल मारणे आणि संतोष मारणे यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला वाहतूक सुविधेच्या माध्यमातून हातभार लावणारा हा उपक्रम मुठा खोऱ्यासाठी दिशादर्शक ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन श्री म्हसोबा देवस्थान, खारवडे यांच्या वतीने करण्यात आले होते.







