काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चार पोलिस अधिकारी व अंमलदार ऑगस्ट २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला सलाम करत सेवागौरव सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) पोलिस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे करण्यात आले.
सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये पोलिस मुख्यालयातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश भागुजी उगले, पिंपरी पोलिस ठाण्यातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक अनिल बाबुराव देशमुख, पिंपरी पोलिस ठाण्यातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक अशोक घनशाम परदेशी तसेच हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई शशिकांत बापूसाहेब कांबळे यांचा समावेश आहे.
या वेळी पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करून त्यांच्या सेवेला गौरविले. तसेच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
पोलिस दलातील दीर्घकाळच्या सेवेनंतर नव्या आयुष्याला सुरुवात करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांच्या योगदानाची यावेळी आठवण करून देण्यात आली. कार्यक्रमाला पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.







