पुण्यात तीन विभागांत विशेष पथके तैनात; लक्ष्मीरोडवर देखरेख कक्ष, २४ तास नियंत्रण
काशिनाथ शिंदे
पुणे: सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा सुरळीत आणि सुरक्षित राहावा, यासाठी महावितरणने व्यापक नियोजन केले आहे. पुणे शहरातील पर्वती, शिवाजीनगर आणि रास्तापेठ या तीन विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची विशेष पथके मिरवणूक मार्गांवर तैनात करण्यात आली आहेत. २४ ते २६ सप्टेंबर तसेच मानाच्या गणपतींचे विसर्जन पूर्ण होईपर्यंत ही यंत्रणा अहोरात्र कार्यरत राहणार आहे.
पर्वती विभागात १५ पथके तैनात
महात्मा फुले मंडई कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व पथकांच्या संपर्कात राहणार असून, विभागात प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचे एकूण १५ पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारपेठ-सदाशिवपेठ शाखेअंतर्गत मंडई परिसर, तुळशीबाग, दगडूशेठ गणपती परिसर, कुमठेकर रस्ता, एस.पी. महाविद्यालय, अलका चौक, रामेश्वर चौक ते मामलेदार कचेरी या भागात सहा पथके तैनात आहेत. पेरुगेट चौकात स्वतंत्र आपत्कालीन पथक ठेवण्यात आले आहे.
नवीपेठ-दत्तवाडी शाखेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, गांजवे चौक, दांडेकर पूल, जनता वसाहत, सिंहगड रस्ता, म्हात्रे पूल आणि म्हसोबा चौक परिसरात नऊ स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.
शिवाजीनगर विभागात मार्गनिहाय पथके
मोदी गणपती, शिवाजीनगर गावठाण आणि खडकी या तीनही शाखांमध्ये स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. समाधान चौक ते गणपती चौक, कुंठे चौक, शगुन चौक, चित्रशाळा चौक, गरुड गणपती चौक ते अलका चौक या मार्गावर पथके तैनात करण्यात आली आहेत.
शिवाजीनगर शाखेअंतर्गत पोलीस मैदान, महापालिका, वाकडेवाडी-संचेती रुग्णालय आणि पाटील इस्टेट परिसरात पथके कार्यरत राहतील. तर खडकी शाखेअंतर्गत सागर हॉटेल ते सोनार गल्ली, माऊली चौक ते राजमोल चौक, कॅन्टोन्मेंट रुग्णालय ते गाडी अड्डा तसेच भाटिया लॉज ते राम मंदिर या विसर्जन मार्गांवर महावितरणचे कर्मचारी तैनात राहणार आहेत.
लक्ष्मीरोडवर विशेष देखरेख कक्ष
गणेश विसर्जन मिरवणुकीतील महत्त्वाचा मार्ग असलेल्या लक्ष्मीरोडवर झुडिओच्या शेजारी दरवर्षीप्रमाणे यंदाही महावितरणकडून विशेष देखरेख कक्ष उभारण्यात येणार आहे. या कक्षातून वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीच्या हालचालींवर शेवटपर्यंत लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार परिस्थिती हाताळणार आहेत.
रास्तापेठ विभागही सज्ज
रास्तापेठ विभागातील समाधान चौक, लाल महाल चौक आणि पासोड्या विठोबा मंदिर चौक येथे प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय आपत्कालीन वीजपुरवठ्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळांची पाहणी करून विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहेत. विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व पथके २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.
महावितरण नियंत्रण कक्ष : ७८७५७६७२२७
शिवाजीनगर विभाग तक्रार क्रमांक : ७८७५७६७५३१






