२५सप्टेंबरपर्यंतविविध ठिकाणीमोफतआरोग्यतपासणी, रक्त तपासणी, ईसीजी आणि औषधोपचार; २० लाखांहून अधिक नागरिकांच्या तपासणीचे राज्याचे उद्दिष्ट
काशिनाथ शिंदे
पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विविध ठिकाणी समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधित यंत्रणांना या शिबिरांचे प्रभावी नियोजन करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्यांसह आवश्यक रक्त तपासण्या, ईसीजी तपासणी, इतर निदानात्मक व उपचारात्मक तपासण्या तसेच मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शासकीय यंत्रणांसह वैद्यकीय संस्थांचा सहभाग
अभियान यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त, नगरपालिका प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्याशी संबंधित यंत्रणांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या सहकार्याने ही आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. शिबिरांच्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी, निदानासाठी आवश्यक साधने तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
राज्यभर २० लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम यंदा दुसऱ्या वर्षात प्रवेश करत असून, राज्यभरात २० लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था आणि दाते यांच्या सहभागातून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने या माध्यमातून आरोग्य तपासणीचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






