वल्लभनगर आगारातून जादा एसटी बसची सुविधा; चालक-वाहकांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान, प्रवाशांना आरती पुस्तिकांचे वाटप
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड: गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणातील खेड, रत्नागिरी येथे आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वल्लभनगर आगार, पिंपरी-चिंचवड येथून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा एसटी बसची व्यवस्था करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक कोकणात आपल्या मूळ गावी जात असतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. यावेळी एसटी बसचे चालक, वाहक तसेच वल्लभनगर बसस्थानकाच्या आगारस्थानक प्रमुख पल्लवी मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच गावी जाणाऱ्या प्रवाशांना गणपती आरती पुस्तिकांचे वाटप करून गौरी-गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. प्रवाशांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष अनिल पालांडे, कार्याध्यक्ष अंकुर चव्हाण, सहसचिव संकेत कदम, सहखजिनदार प्रकाश आखाडे, मार्गदर्शक गजानन मोरे, सुनील शिंदे मामा, मधुकर कदम, ज्ञानेश्वर कदम यांच्यासह सभासद कैलास मोरे, अरविंद मोरे, सुधीर जाधव, संदीप जंगम, रोशन चाळके, सोहम कदम तसेच माजी अध्यक्ष अभिजीत कदम आणि अन्य सभासद उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांच्या प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी संस्थेने घेतलेला हा पुढाकार सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला आहे. प्रवाशांची सेवा आणि उत्सवाचा आनंद यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






