काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : शहरात यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून विविध भागांत भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री, अभिनेते तसेच नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमांना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दहीहंडी उत्सवावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहीहंडी कार्यक्रमादरम्यान अश्लील नृत्य, आक्षेपार्ह प्रकार अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य आढळल्यास संबंधित आयोजक व मंडळांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे उत्सवाचे आयोजन करताना मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबतही निर्धारित नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ध्वनीप्रदूषण तसेच नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्री मोरया गणपती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. उत्सवाच्या माध्यमातून भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.







